जम्मू काश्मीर मधील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे.
दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. हल्लेखोर दहशतवादी ८ ते १० च्या संख्येतील असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दहशतवाद्यांनी ४० पर्यटकांना घेरुन आधी त्यांची नावे विचारली आणि हिंदू धर्मीय नावे असलेल्या पर्यटकांना गोळ्या घातल्या, तसेच गोळ्या घालण्याच्या आधी त्यांच्याकडून नमाज पढून घेण्यात आल्याची खळबळजनक माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितली आहे. या हल्ल्यात नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
ही घटना २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतरची सर्वात मोठी मानली जात आहे. मुस्लिम गैर धर्मियांना टार्गेट करण्यात आले. तसेच हिंदूंना नमाज पढण्यास लावणे हे अतिशय चीड निर्माण करणारे कृत्य या दहशतवाद्यानी केले आहे. पुण्याचे संतोष जगदाळे आणि त्यांचे मित्र कौस्तुभ गनबोटे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत बेताब व्हॅली येथे फिरायला गेले असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. संतोष आणि कौस्तुभ यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने श्रीनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या पत्नी व मुलीने या घटनेनंतर भेदरलेल्या अवस्थेत माध्यमांशी संवाद साधला.
“अजान म्हणायला लावली आणि गोळ्या झाडल्या”
संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिने ‘न्यूज १८ लोकमत’शी बोलताना अत्यंत भावनिक वर्णन केले. ती म्हणाली, “पोलिसांच्या वेशात काही लोक आले. त्यांनी विचारलं, ‘हिंदू आहात की मुस्लिम?’ वडिलांना अजान म्हणायला लावली. मग ‘मोदींना डोक्यावर घेतलंत’, ‘आमच्या धर्मावर नावं ठेवता’ असं म्हणत गोळ्या झाडल्या. “‘स्त्रियांना आम्ही काही करत नाही… पण’ अतिरेक्यांनी स्त्रियांना लक्ष्य न केल्याचे भासवून आपल्या कृतीसाठी अजब समर्थन दिलं. “आम्ही स्त्रियांना काही करत नाही, तरीही आमच्या धर्माची बदनामी करता,” असं ते म्हणत होते. या शब्दांत त्यांच्या मानसिकतेचा आणि उद्दिष्टाचा हेतू उघड होतो की, हल्ल्याचा हेतू केवळ दहशत माजवणं नव्हतं, तर मुस्लिम गैर धर्मीय लोकांना लक्ष्य करणे हाच उद्देश होता.

हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टेंस फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेरलं असून, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून देखील निगराणी ठेवली जात आहे. मात्र सुरक्षेतील त्रुटींवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आसावरीने सुरक्षेवर रोष व्यक्त करत म्हटलं, “जिथं गरज आहे तिथं पोलीस नाहीत, पण जिथं गरज नाही तिथं मात्र पोलीस आहेत. हल्ल्यानंतर कोणतंही अपडेट मिळत नाहीय.” या विधानामुळे जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या यंत्रणांवर लोकांचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे.
धार्मिक वादाचा सर्वसामान्यांवर परिणाम दिसून येतो. घटनेच्या शेवटी आसावरीने अतिशय संयमीपणे सांगितलं, “हिंदू-मुस्लिम यामध्ये घट्ट मैत्री असते, पण अशा हल्ल्यांमुळे त्या नात्यांवरही संशय घेतला जातो. यावर सरकारने ठोस उपाय शोधावेत.” हे वक्तव्य एका तरुणीच्या मनातील असुरक्षिततेचं आणि वेदनेचं स्पष्ट दर्शन घडवतं.
