संपादकीय : सहदेव जाधव
बीड जिल्हा सध्या गुन्हेगारी मुळे कुप्रसिद्ध झाला आहे. याला एकमेव कारण म्हणजे फक्त गुन्हेगारांना मिळणारा राजश्रय.! नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन गाजले ते फक्त बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर. आणि विशेषतः बीडमधील मस्साजोगाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. या प्रकरणातील आरोपी चार आरोपी पकडले आहेत. मात्र अजूनही काही आरोपी फरार आहे. आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर अंगावर शहारे आणणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला.
त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “या प्रकरणी शुक्रवारी सविस्तर उत्तर देईन, पण या प्रकरणात जो असेल त्यावर कारवाई होईल, कठोरात कठोर कारवाई होणार, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे.

मुख्यमंत्री संवेदनशील.. निर्णय अचूक घेणार
“बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये जी घटनी घडली यावर मी नंतर उत्तर देणार आहे. पण सर्व वसुलीबाज आहे. हे कोणाचा ना कोणाचा आसरा घेत असतात. तो देणे बंद होईल तरच महाराष्ट्राचा विकास होईल. यात आम्ही कठोरात कठोर कारवाई करणार आहोत. गुंतवणूकदारांना त्रास दिला तर गुंतवणूक येणार नाही. वसुलीबाज आसरा घेतात,आपण आसरा दिला नाही तर महाराष्ट्र पुढे जाईल. जो असेल त्यावर कारवाई होईल, कठोरात कठोर कारवाई होणार, आमचे झिरो टॉलरन्स धोरण आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
अधिवेशन सुरु झाल्यापासून वाल्मिक कराड या नावा भोंवती अधिवेशन गाजत आहे. त्यातच काल आ जितेंद्र आव्हाड यांनी केलेले भाषण अंगावर शहारे आणत होते. बुधवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या चर्चेत आव्हाड म्हणाले की, “वाल्मीक कराडवर दाखल खंडणीचा गुन्हा आणि देशमुख हत्या प्रकरणात एक लिंक आहे. असं असताना अजूनही वाल्मीक कराडवर हत्येचा गुन्हा का दाखल झालेला नाही? कराडचा ‘आका’ तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेला असताना पोलिस निष्पक्ष चौकशी करतील, अशी आशा कशी बाळगायची, असेही आव्हाड म्हणाले. यावेळी त्यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या कडे उंगली निर्देश केले आहेत.

यावेळी भाजप आमदार यांनी देखील खुन कसा केला हे ऐकताना ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले नसेल तर नवल. भाजपचे आमदार सुरेश धस यावेळी म्हणाले की या प्रकरणात सुदर्शन घुले याने मस्साजोगच्या एका दलित वॉचमनला मारहाण केली. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी देशमुख पोलिस ठाण्यात गेले. पण त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. महाजन नावाच्या पोलिस निरीक्षकाच्या गाडीतून आरोपी फिरत होते. असे आवर्जून सभागृहात सांगितले.
तर या सर्वांचा मोरख्या वाल्मिक कराड असल्याचे संदीप शिरसागर यांनी सभागृहात सांगितलं. तर नाना पटोले यांनी देखील वाल्मिक कराड याच्या गुन्हेगारी वर सरकारला धारेवर धरले. आ. नमिता मुंदडा यांनी देखील बीड च्या परिस्थिती वर चिंता व्यक्त केली.

वाल्मिक कराड आहे तरी कोण ?
वाल्मिक कराड हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलाय. तर हा वाल्मिक कराड कोण आहे याची उत्सुकता सर्व महाराष्ट्राला लागलेली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा अतिशय निकटवर्ती समजला जातो. परळी नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष आहे. कुठल्याही पदावर नसताना देखील कायम दोन पोलिसांचे संरक्षण घेऊन बीड मध्ये वावरत आहे. तसेच या इसमाच्या इच्छेवरून सर्व अधिकाऱ्यांची बदली होते. तर प्रशासनावर या कराड चा धाक असल्याचे बोलले जाते. आता या वाल्मिक ला पकडण्यात पोलिसांवर दबाव का नसावा.?त्यातच एवढी मोठी घटना घडली असताना देखील धनंजय मुंडे यांनी चकार शब्द देखील काढला नाही. यावरून धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांना पाठीशी घालत असल्याचे निषपन्न होते का?
उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे. त्यामुळे बीड मध्ये खरंच आधुनिक युगातील वाल्ह्या ने जन्म घेतलाय का? हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

