शिर्डी वृत्तसेवा: वाळू आणि खडी माफियांच्या जीवावर दहशतीचे राजकारण करणाऱ्यांच्या संगमनेर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. ज्यांना आपल्या मतदारसंघातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही, ते टँकरमुक्त शिर्डी मतदारसंघात विकासाची भाषा करतात.
आजवर त्यांनी हसून इतरांची जिरवली. आता विधानसभा निवडणुकीत मतदार त्यांची जिरवतील, अशा शब्दांत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्ला चढविला. महायुतीच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
विखे पाटील म्हणाले की, टोळ्या आणि माफियांच्या जीवावर दहशत निर्माण करणाऱ्या संगमनेरच्या नेत्यांचा चेहरा राज्याला दिसला. राहाता तालुक्यातील जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. गणेश कारखाना चालवायला घेतला म्हणून तो शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला. समन्यायी पाणीवाटप कायद्याचे भूत त्यांच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले. खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी भोगवटा वर्ग एकच्या भोगवटा दोन केल्या. शिर्डी आणि कोपरगाव औद्योगिक वसाहतीसाठी जवळपास नऊशे एकर जमीन मोफत उपलब्ध करून दिली. निळवंडे कालव्यांची कामे मार्गी लावली. जिल्ह्याच्या नामांतराबरोबरच नेवासे येथील ज्ञानेश्वर श्रुष्टी, अहिल्यादेवींचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय झाला. ते महसूलमंत्री असताना ही कामे का झाली नाहीत?
लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी न्यायालयात जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि उमेदवारांना जनता या निवडणुकीत थारा देणार नाही. वाळू माफिया आणि एजंटांना पुढे करून, डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा कट संगमनेरच्या नेत्यांनी रचला. वसंतराव देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा आम्ही निषेध केला. त्यांनी मात्र हल्लेखोरांचा निषेध करण्याची दानत दाखविली नाही. असं मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.