मै हुं डॉन या गाण्यावर डान्स.. गाण्यावरून अनेकांच्या चर्चा
खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या कार्यक्रमात गौरी दगडे ठरल्या एक तोळा सोन्याच्या हाराच्या मानकरी
संगमनेर प्रतिनिधी: संगमनेर शहरात जनसेवा फाउंडेशनच्या वतीने मकर संक्रांती निमित्त विधानसभा मतदारसंघातील खास महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा, सन्मान महिलांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. घेण्यात आलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात काही गाणे हे चर्चेचा विषय ठरली. यामध्ये झालय झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट.. आणि मै हु डॉन… या गाण्याच्या तालावर लहान बालगोपाळां मध्ये सहभागी होऊन मा. खा. डॉ. सुजय विखे व आ अमोल खताळ यांनी ठेका धरत नृत्य सादर केले. त्यांच्या साथीला उपस्थित असलेल्या महिलांनी सुद्धा या गाण्याच्या तालावर ठेका धरत नृत्य सादर करत एकच जल्लोष साजरा केला.
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्या नगर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी ताई विखे पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे माजी खा डॉ सुजय विखेपाटील आणि रणरागिनी महिला मंडळ अध्यक्षा धनश्रीताई विखे व संगमनेरचे आ अमोल खताळ यांच्या पुढाकारातून शहरातील जाणता राजा मैदानावरती खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व महिलांना संक्रातीचे वाण म्हणून जेवणाचा डबा भेट देण्यात आला.

माजी खासदार डॉ सुजय विखे त्यांच्या सुविद्य पत्नी, रणरागिणी महिला मंडळ अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे व आमदार अमोल खताळ त्यांच्या सुविद्य पत्नी निलमताई खताळ यांनी या कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांचे स्वागत केले. निवेदक संदीप पाटील यांनी उपस्थित असलेल्या महिलांचे रस्सीखेच, संगीत खुर्ची, लंगडी घालून बॉल पकडणे, विविध गाण्यांवरती नृत्य सादर करणे व कॉमेडी करणे या सारख्या अनेक स्पर्धा घेतल्या या स्पर्धांमधून विजेत्या ठरलेल्या महिलांना पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.
तर जमा झालेल्या कुपनामधून लकी ड्रॉ काढण्यात आला. या लकी ड्रॉ सोडतीत संगमनेर शहरातील गौरी नितीन दगडू ही महिला एक तोळे वजनाच्या सोन्याच्या हाराची मानकरी ठरली. द्वितीय पुरस्कार विभावरी संतोष वाकचौरे आणि शीतल संतोष देशमुख या दोन महिलांना ४० इंची सोनी कंपनीची एलईडी टीव्ही देण्यात आल्या. शितल संतोष शेवंते आणि कल्याणी आप्पासाहेब दरेकर या दोन महिला सॅमसंग कंपनीचे डबलडोअर फ्रिजच्या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या, डॉ वर्षा अजिंक्य उपासनी आणि वनिता किरण लहारे या दोन महिला ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन च्या चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरल्या, तसेच एअर कुलर, वॉटर प्युरी फायर, प्रेस्टीज मिक्सर, वंडरशेफ ओव्हन, प्रेस्टीज व्हॅक्यम क्लिनर,प्रेस्टीज इंडक्शन आदी वस्तू बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

‘मुझको पहेचान लो मैं हूँ डॉन’ या गाण्या वर भाजपचे माजी खासदार डॉ सुजय विखे यांनी ठेका धरत डान्स केला. या गाण्यावर नृत्य सादर करत माजी खा डॉ विखे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना खिजवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा संपूर्ण शहरात होत आहे.
जाणता राजा मैदान कधीच भरत नाही असे काहीजण म्हटले होते. परंतु संगमनेर च्या या लाडक्या बहिणींनी हे जाणता राजा मैदान भरून दाखवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असा खोचक टोला विधानसभा निवडणुकीच्या वेळी जाणता राजा मैदान बुक करणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता भाजपचे माजी खासदार डॉ सुजय विखे यांनी लगावला.

