अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपचा शनिवारी पहाटे धांदरफळ शिवारात अपघात झाला होता. पोलीस पाठलागावर असताना पिकअप विहिरीत कोसळला. यात ड्रायव्हरचा बुडून मृत्यू झाला होता.
तर इतर चौघे बालंबाल बचावले होते.विना चेसी व नंबर प्लेटचा पिकअप होता. परंतु या घटनेननंतर ही घटना अंगलट येऊ नये, यासाठी महसूल प्रशासनाने पिकअप चोरी गेल्याचा गुन्हा दोन दिवसांनी पोलिसात दाखल केला. त्यामुळे ग्रामस्थांमधून विविध चर्चाना उधाण आले आहे.महसूल प्रशासनाचा हा बनाव असल्याचा आरोप मंगळापूर ग्रामस्थ सध्या करत आहेत.
अधिक माहिती अशी : संगमनेर बुद्रुकचे मंडळ अधिकारी बाबाजी किसन जेडगुले यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादत म्हटले आहे की, २५ ऑक्टोबर रोजी विना परवाना गौण खनिजाची चोरी करणारी विना नंबरची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप १ ब्रास वाळूसह पोलिस वसाहतीत लावण्यात आली होती.८० हजारांचा पिकअप असून त्यामध्ये १ हजार रुपयांची १ ब्रास वाळू असल्याचे जेडगुले यांनी फिर्यादीत म्हटले. २५ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान बोलेरो पिकअप चोरी झाली असे म्हटले आहे. यावरून मोहन बारकू भोकनळ, शिवाजी राधाकिसन घुले (मंगळापूर, ता. संगमनेर) या दोघांवर शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
ग्रामस्थ काय म्हणत आहेत ?या बोलेरो पिकअपचा अपघात झाल्यावरच हा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना अंगलट येऊ नये, यासाठी महसूल प्रशासनाने पिकअप चोरी गेल्याचा गुन्हा दोन दिवसांनी पोलिसात दाखल केला. महसूल प्रशासनाचा हा बनाव असल्याचा आरोप मंगळापूर ग्रामस्थ करतायेत. यामुळे सध्या तालुक्यात उलटसुलट चर्चा घडत आहेत.