मुंबई वृत्तविभाग: मुंबईतील आमदार निवासस्थानामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि २ जणांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली. रात्री झोपले असताना दोघांनी येऊन झटापट केल्याची माहिती मेहबूब शेख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. या प्रकरणी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आमदार निवासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि २ जणांमध्ये झटापटी झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री झोपलेलो असताना दोघे जण दारुच्या नशेत आले. त्यावेळी मेहबूब शेख आणि त्यांच्यात झटापटी झाल्याचे मेहबूब शेख यांनी सांगितले आहे. या प्रकरणानंतर एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत प्रकिया सुरू आहे.
मेहबूब शेख यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेहबूब शेख यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन यासंबंधीची माहिती घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे.