मुंबई वृत्तविभाग : नवीन वर्षाचे स्वागत करत असताना आमच्या सर्वांचे लाडके सनदी अधिकारी, प्रशासनाचे महामेरू ,सनदी अधिकाऱ्यातील मुकुटमणी असलेले आदरणीय करीर सर यांची राज्याच्या प्रशासनातील सर्वोच्च स्थानी म्हणजे मुख्य सचिव पदी नियुक्ती होत असल्याची घटना ही आनंद द्विगुणीत करणारी ठरली आहे. स्वामी विवेकानंदांसारखी प्रखर-तेजस्वी बुद्धिमत्ता, विषयाचे सखोल ज्ञान, सकारात्मक दृष्टिकोन, अनन्यसाधारण निर्णय क्षमता, जटील प्रश्नांवर नेमकेपणाने तोडगा काढण्याची अलौकिक हातोटी या सरांच्या जमेच्या बाजू आहेत.
प्रशासनात अनेक उच्च पदांवर काम करताना आपल्या हाताखालील कनिष्ठतम अधिकाऱ्यालाही सन्मानाची वागणूक देणारे, आपले मत मोकळेपणानं मांडण्याची संधी देणारे सर हे एकमेवाद्वितीय आहेत. माणुसकीचा, आपलेपणाचा, आत्मीयतेचा ओलावा असणारे हे सनदी अधिकारी असल्याने तळागाळातल्या अधिकाऱ्यांनाही ते आपलेसे वाटतात.
करीर सरांसारख्या डायनॅमिक, सर्वगुणसंपन्न, परिपूर्ण आणि तरीही साधेपणाने सर्वांशी जवळीक साधणाऱ्या अधिकाऱ्याची मुख्य सचिव पदी वर्णी लागावी अशी माझ्यासारख्या हजारो अधिकाऱ्यांची अंतकरणपूर्वक तळमळ होती. ती आज पूर्णत्वास जात आहे. याचे खूप खूप समाधान वाटते. सरांचे मनःपूर्वक अभिनंदन!! आणि नवीन मुख्य सचिव पर्वासाठी शुभेच्छा!!
….. (शब्दांकन: अजीतजी देशमुख, उपसचिव महसूल व वन विभाग)