नगर शहरासह जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक असून, विधीमंडळापर्यंत या वाढत्या गुन्हेगारीविषयी तक्रार गेल्या आहेत. तरी देखील गुन्हेगारांवर अंकुश नाही.
आता या गुन्हेगाराविरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नगरमधील काका-पुतण्यांने लक्ष वेधले आहे.शरद पवार यांची भेट घेऊन माजी आमदार दादा कळमकर आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी नगरमधील वाढत्या गुन्हेगारीविषयी चिंता व्यक्त केलीय. दरम्यान, नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उमेदवार देणार आहेत. यावरून शरद पवार नगरमध्ये सक्रिय झाल्याची चर्चा आहे.
नगर शहर व जिल्ह्यात मागील काही काळात गुन्हेगारीत खूप मोठी वाढ झाली आहे. खून, दरोडे, लुटमार, चोऱ्यांच्या घटना, शस्त्रधारी हल्ले, अवैध गावठी पिस्तुल विक्रीचे प्रमाण, तलवारी, सुरे, चाकू बाळगूण वेळप्रसंगी त्यातून हल्ले करणे असे वाढले आहेत. महिला, शाळा, महाविद्यालयांमधील मुलींमध्ये यातून असुरक्षितेची भावना वाढली आहे. विनयभंग, अत्याचार, मुलींना फूस लावून पळून नेण्याचे प्रकार देखील वाढले आहेत.
व्यापारी, सर्वसामान्यांमध्ये असुरक्षितेची भावना वाढली आहे. अवैध शस्त्र सहज उपलब्ध होणे, हे वाढत्या गुन्ह्याचे द्योतक आहे. ते नगरमध्ये मिळत असून, पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. यातून गुन्हेगारीला बळ मिळते आहे. पोलिस अधिकारी चमकोगिरीत अडकल्याने, राजाश्रयाला गेलेल्या गुन्हेगारांना नगरमध्ये मोकळे रान झाल्याकडे कळमकर काका-पुतण्यांनी शरद पवार यांचे लक्ष वेधले.पोलिस प्रशासनाने ग्राऊंडवर येऊन कारवाई केली, तरच गुन्हेगारांवर जरब बसते. मात्र पोलिस दलाकडून फक्त कागदोपत्री रेकाॅर्ड तयार करून कारकुनी केली जात आहे. यातून गुन्हेगारांवर कायद्याचा अंकुशाचा मूळ उद्देश दूर राहत असल्याचे दिसते आहे.
लोकसभा निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरच काय, राज्यातील वाढती गुन्हेगारी समाजहितासाठी घातक ठरणार आहे.नगरमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये झालेल्या घटनांचा दाखल देत गुन्हेगारांकडून जमिनी बळकावण्याच्या प्रकारांकडे माजी आमदार दादा कळमकरांनी पवार यांचे लक्ष वेधले. शरद पवार यांना गेल्या नगर शहरासह जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील गंभीर गुन्ह्यांची फाईलच माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली.
शरद पवार यांच्याकडे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा आहे. लोकसभेची आचारसंहिता पुढील महिन्यात लागणार आहे. उमेदवार निश्चित झाला आहे. निवडणुकीच्या काळात गुन्हेगारी अधिक वाढते. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. तसेच निर्भय वातावरणात निवडणूक झाली पाहिजे, यासाठी नगरसह राज्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात शरद पवार राज्य सरकारचे लक्ष वेधणार आहे. नगरमधील वाढत्या गुन्ह्यांवर देखील राज्य सरकारचे लक्ष वेधणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिल्याची माहिती अभिषेक कळमकर यांनी दिली.