संपादकीय
वंचीतची प्रचारात आघाडी तर महायुती व महाविकास आघाडीची प्रचारात पिछाडी
शिर्डी: शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. आज अर्जांची छाननी होणार आहे. महायुती कडून सदाशिवराव लोखंडे हे उमेदवार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व लोखंडे करत आहेत. तर महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे हे उमेदवार आहेत. त्यांनी देखील शिवसेनेकडून शिर्डी लोकसभेचे नेत्रुत्व केले आहे. वाकचौरे यांनी २००९ मध्ये रामदास आठवले यांचा पराभव केला होता. २०२४ ची शिर्डी लोकसभा निवडणुकीत दुरंगी लढत होण्याची शक्यता वाटत असतानाच अचानक काॅंग्रेसच्या युवा नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या राहिलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी या निवडणुकीत उडी घेत तिरंगी लढत सिद्ध केली आहे. आपण आज या निवडणूकीत कोण बाजी मारेल याचा तालुकानिहाय आढावा घेऊया.
१)अकोले
अकोले तालुक्यात सदाशिवराव लोखंडे, भाऊसाहेब वाकचौरे व उत्कर्षा रुपवते यांचा जनतेतून आढावा घेतला तर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोले तालुक्यातून खा सदाशिवराव लोखंडे यांच्यावर प्रचंड मोठी नाराजी दिसुन येते. स्व:पक्षिय म्हणजेच शिवसैनिकांच्या संपर्कात न राहिल्याने मोठा फटका लोखंडेना बसणार आहे. भाजपाचे मतदार देखील त्यांच्यावर कितपत खुष आहेत हे देखील संशोधनाचाच विषय आहे. राष्ट्रवादी अजीतदादा पवार गटा सोबत देखील लोखंडेंचे किती सख्य आहे हे देखील शंकास्पद आहे. अकोले तालुक्यातील आजी माजी आमदार लोखंडे यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर एकत्र तर दिसत आहे परंतु ग्राउंड ला कुणीही नेता मनसे उतरलेला दिसत नाही.
तर दुसरीकडे भाऊसाहेब वाकचौरे हे अकोल्याचे भुमी पुत्र आहेत परंतु ते अनेक वर्षापासून शिर्डी येथे स्थायिक आहेत. वाकचौरे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. खासदार असताना वाकचौरे यांनी अकोलेकरांच्या सुख दुःखात सहभागी राहत होते. तर अनेक गावांना विविध विकासकामांतून निधी मिळवून दिला होता. स्थानिक पुढाऱ्यांच्या संपर्कात ते आजही कायम राहिले. अनेक ठिकाणी त्यांनी सभामंडप दिलेले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सोबत भांगरे कुटुंबीय वगळता अकोल्यातून बडा नेता सोबत दिसत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी वगळता काॅंग्रेस व शरद पवार गट अजून प्रचारात उत्साहीपणे सामील नाही. त्यामुळे वाकचौरे यांना या तालुक्यातून मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अकोलेकरांचा ओघ लोखंडे यांच्या पेक्षा वाकचौरे यांच्याकडे वाटत असतानाच उत्कर्षा रुपवते यांची या निवडणुकीत एन्ट्री झाली, आणि या निवडणुकीचे सगळे समिकरणे बदलून गेलीत. उत्कर्षा रुपवतेंच्या माध्यमातून लोखंडे व वाकचौरे यांना मोठा फटका बसणार आहे. अकोलेकरांनी लोखंडे व वाकचौरे यांच्यावर गद्दारीचा शिक्का मोर्तब करत उत्कर्षा रुपवतेंना पसंदी देताना दिसत आहे. उत्कर्षा रुपवते यांनी देखील आपली लेक आहे अशी भावनिक साद घातली आहे. तसेच मी निष्कलंक व्यक्तीमत्व आहे. राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून अनेक पिडित महिलांना न्याय मिळवून दिला आहे. काॅंग्रेस मध्ये महत्वाच्या पदावर काम केलेले असल्याने तरुणांमध्ये मोठी क्रेझ उत्कर्षाची राहिली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात उत्कर्षा रुपवते यांचे पारडे जड राहणार असा अंदाज आहे.
२) संगमनेर
लोकसभेच्या या रणधुमाळीत संगमनेर तालुक्याचे विशेष महत्त्व राहणार आहे. काॅंग्रेसची भुमिकाच या उमेदवारांसाठी महत्वाची राहणार आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांचा हा बालेकिल्ला परंतु ते कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी आपली ताकद देतात हे महत्त्वाचे राहणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी राहात्यातील सभेतून थोरातांना काढलेले चिमटे हे वाकचौरे यांना त्रासदायक ठरू शकतात. त्यातच नाशिक पदवीधर निवडणूकीचा पॅटर्न थोरात चालवणार तर नाही ना अशी चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या वर लाभार्थी वगळता प्रचारात कुणीही सामिल झालेले दिसत नाही. अंतर्गत गटबाजी संगमनेर तालुक्यात लोखंडेंची डोकेदुखी ठरणार आहे.
वाकचौरे यांच्या शिवसेनेत देखील मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. काही दिवसांपूर्वी वाकचौरे यांनी आयोजित बैठकीत थेट एकमेकांना धक्काबुक्की करण्यापर्यंत मजल गेली होती. वाकचौरे व लोखंडे यांची पक्षांतर्गत गटबाजी आणि सोबत असलेल्या घटकपक्षांची नाराजी अद्याप निघाली नाही त्यामुळे या दोघांपुढील रुपवतेंचे आव्हान मोठं असणार आहे. संगमनेर तालुक्यातील चालू घडामोडींचा अभ्यास केला तर येणाऱ्या काही दिवसांत रुपवतेंकडे संगमनेरकरांचा कौल वाढणार यात शंका नाही.
उत्कर्षा रुपवते यांचा साधा सरळ स्वभाव… कुठलाही बडेजाव नाही… कुठलाही अभिमान नाही… चेहऱ्यावर सदा सर्वदा स्मित हास्य. महिला आहे म्हणून संकोचित वृत्ती तर अजिबात नाही. बिंधास्त व्यक्तीमत्व, हुशार, चाणाक्ष्य, उच्च शिक्षीत असे सुसंस्कृत नेत्रुत्वाची भुरळ संगमनेरकरांना सध्या पडत आहे. त्यातच अनेक उच्च पदावर काम करुन ही कुठलाही कलंक स्वतःवर पडू दिला नाही. म्हणून या निवडणुकीत निष्कलंक व्यक्तीमत्व म्हणून सामोरं जाणार आहे. एक प्रतिभाशाली व्यक्तीमत्व शिर्डीचे नेत्रुत्व करेल, व अशा नेत्रुत्वास संगमनेरकर नक्की स्विकारतील
३)कोपरगाव
कोपरगाव तालुक्यात कोल्हे काळे व परजणे यांच्या कडे एक मोठा गठ्ठा मतदार आहेत. या निवडणुकीत कोल्हे कुटुंब महायुतीत सहभागी झाले नाही तर यांचा कौल उत्कर्षा रुपवतेंकडे राहील. तर विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचा रोख लोखंडे यांच्या कडे दिसतो आहे. परजणे हे देखील लोखंडे यांना साथ देऊ शकतात. वाकचौरे या तालुक्यात तिसऱ्या स्थानावर जाऊ शकतात. या तालुक्यात मात्र रुपवते विरुद्ध लोखंडे अशी काट्याची लढत बघायला मिळणार आहे.
४)राहाता
राहाता तालुक्यातील अवस्था सदाशिवराव लोखंडे यांच्या साठी फायदेशीर आहे. परंतु या ठिकाणी वाकचौरे यांची देखील पकड मजबूत आहे. लोखंडे यांच्या वर वैयक्तिक नाराजी याही तालुक्यात कायम आहे. परंतु महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून लोखंडे यांचे पारडे याठिकाणी मजबुत आहे. राहाता तालुक्यातील उत्कर्षा रुपवते यांचाही जनसंपर्क वाढलेला आहे.
५)श्रीरामपूर
श्रीरामपूर तालुक्यातील बडे नेते अजूनही निवांत आहेत. बडे नेते मोठ्या सभा वगळता ग्राउंड वर एकत्र येताना दिसत नाही. त्यामुळे अंतर्गत गटबाजी येथे देखील कायम आहे. परंतु या तालुक्यात मात्र लोखंडे यांचे पारडे जड राहील असे चित्र सध्यातरी दिसत आहे. उत्कर्षाताई रुपवते यांच्यामुळे मात्र या तालुक्यातून भाऊसाहेब वाकचौरे यांना मोठा फटका बसणार आहे.
६)नेवासा
नेवासा तालुक्यात वेगळं चित्र दिसत नाही. या तालुक्यात देखील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर जनतेसह मित्रपक्षात मोठी नाराजी आहे. त्यामुळे या तालुक्यात या दोन्हीही उमेदवारांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. लोखंडे व वाकचौरे हे दोन्ही ही उमेदवार मित्र पक्षातील स्थानिक नेत्यांच्या संपर्कात नसल्याचा आरोप होत आहे. मित्र पक्षाचे पदाधिकारी अजूनही यांच्या प्रचारात सहभागी झालेत का? हा देखील प्रश्नच आहे. त्यामुळे नेवास्यातून उत्कर्षा रुपवतेंच्या माध्यमातून मतदार पर्याय शोधू शकतात.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाची महायुतीची मदार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वर तर महाविकास आघाडीची मदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वर आहे. परंतु या निवडणुकीत या दोन्ही ही बड्या नेत्यांच्या विश्र्वासातील हे उमेदवार आहेत का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बाबत नक्की भुमिका काय आहे? सत्यजित तांबे यांची सध्या भुमिका काय आहे? अकोले तालुक्यातील वैभव पिचड व किरण लहामटे यांची भुमिका काय आहे? कोपरगाव तालुक्यात कोल्हे कुणासोबत जाणार? श्रीरामपूर मधून मुरकुटे, लहु कानडे, ससाणे, आदिक यांची भुमिका काय? नेवास्यातील शंकरराव गडाख, बाळासाहेब मुरकुटे, नितिन दिनकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे आदींची भुमिका काय? या सर्व नेत्यांची भुमिका अखेर या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
वंचीत बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांनी नामांकन अर्ज दाखल केला तेव्हा दाखवलेले शक्ती प्रदर्शन अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. हजारोंच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उत्कर्षा रुपवतेंच्या सभेला हजेरी लावत पाठिंबा दिला आहे. उत्कर्षा रुपवते यांचे सोबतची गर्दी बघता शिर्डी लोकसभा निवडणुक सोपी राहिलेली नाही. महायुती व महाविकास आघाडी यांच्या समोर आता वंचीत बहुजन आघाडीने मोठं आवहान उभं टाकलं आहे.