अहिल्यादेवीनगर प्रतिनिधी: अहमदनगरमधील नागापूर परिसरातील वैजनाथ कॉलनीत मंगळवारी (दि. २५) दुपारी अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या १३ जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघा जखमी मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. सुपारी दिल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना अर्धनग्न अवस्थेत गावातून फिरवल्याची ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली.
मंगळवारी या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ही घटना समोर आली. राहुल पाटील, प्रशांत वंजारे, करण काळे, विशाल काटे, विशाल कापरे, हर्षल गायकवाड, सोनू शेख, आर्यन शेवाळे, सागर दारकुंडे, रोहित (पूर्ण नाव माहीत नाही.) पप्पू पगारे (सर्व रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपींनी फिर्यादीची आई, आजी व त्याचा मित्र अभिषेक याला लोखंडी कोयता, लोखंडी सळी, कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. तसेच फिर्यादीचा मित्र संस्कार सुशील रवने यासदेखील आरोपींनी मारहाण केली आहे.
अल्पवयीन मुलांना मारहाण करणाऱ्या राहुल मारूतीराव पाटील (वय २९ रा. शिवाजीनगर, नवनागापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी सायंकाळी चौघा अल्पवयीन मुलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला मारण्याकरीता कोणी सुपारी दिली असे विचारले असता चौघांनी लांकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अल्पवयीन मुलांच्या घरी काही तरूण सोमवारी दुपारी गेले होते. त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करून अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांना अज्ञातस्थळी घेऊन जात लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून धमकी दिली. मारहाणीत हातापायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. मारहाणीचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले.