बीड: माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलेले यला मिळत आहे.
येरवडा कारागृहाच्या जमीन लिलाव प्रकरणात मीरा बोरवणकर यांनी राज्याचे आजचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. अजित पवार यांनीच येरवडा कारागृहाच्या जमीन लिलावाचा आग्रह धरला होता आणि ती जमीन तेव्हा त्यांनी 2जी घोटाळ्यातील सीबीआयने अटक केलेला बिल्डर शाहिद बालवा याला देण्यास सांगितली होती, असे मीरा बोरवणकर यांच्याकडून काल (ता. 16 ऑक्टोबर) झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे.
मीरा बोरवणकर यांनी आरोप केल्यानंतर विरोधकांकडून अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून देखील होणाऱ्या या आरोपांवर प्रत्युत्तर देण्यात येत आहेराज्याचे कृषी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते असलेले धनंजय मुंडे यांनी देखील या प्रकरणी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वीच बीडचे पालकमंत्री पद स्विकारलेल्या धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठकीत हजेरी लावली होती. या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत असतानाच मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात करणाऱ्या आरोपांवरून आपले मत व्यक्त केले आहे. या प्रकरणी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, पुस्तकातली जमिनी लिलावाची नोंद म्हणजे, फक्त बिनकामाचा भडका असून कुठल्याही पालकमंत्र्याला सरकारी जमिनीचा लिलाव करता येत नसतो. हे पुनर्लक्षित प्रकरण आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी, महिला नेत्या रुपाली चाकणकर यांच्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडूनही या प्रकरणातील आरोपांवर प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
तर दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी या प्रकरणावरून मीरा बोरवणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. बोरवणकरांनी अजित पवारांवर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे, अन्यथा कारावाईला सामोरे जावे, असे मिटकरी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी माझ्यावर कारवाई करावी, असे आव्हान मीरा बोरवणकर यांच्याकडून अजित पवार गटाला करण्यात आले आहे.