लोणी (राजसत्ता वृत्तसेवा): ग्रामीण भागाच्या विकासाला केंद्र व राज्य सरकारचे मोठे पाठबळ मिळत आहे. गावांच्या प्रगतीबरोबरच समाजातील शेवटच्या घटकाला योजनांच्या रुपाने मोठा लाभ होत आहे.
ग्रामपंचायतीचे सदस्य या नात्याने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी गावांमध्ये करा, निधीची कमतरता नाही. काम करण्याची फक्त इच्छाशक्ती ठेवा. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरचं नरेंद्र मोदी पुन्हा 2024 ला पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा ठाम विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राहाता, श्रीरामपूर, राहुरी व संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा महसूलमंत्री विखे पा. यांच्या उपस्थितीत पार पडला. भारतीय जनता पक्षाच्या उत्तर नगर जिल्हा कार्यकारणीतील नवीन पदाधिकार्यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. माजी राज्यमंत्री अण्णासाहेब म्हस्के पा. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास चेअरमन कैलास तांबे, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, अण्णासाहेब भोसले, सतिष ससाणे, मच्छिंद्र थेटे, नितीन दिनकर, नितीन कापसे, अशोक पवार, भाजपाचे सचिन शिंदे, श्रीराम गणपुले, दीपक पठारे, बाळासाहेब गाडेकर, योगेश बनकर, भाजप महिला अध्यक्षा कांचन मांढरे, गिता थेटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री विखे पा. म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण राज्यात महायुतीला जनतेने पाठबळ दिले.भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक प्रथम क्रमाकांच्या जागा मिळविल्या. पक्षासह सरकारला ग्रामीण भागातील दिलेले पाठबळ महत्वपूर्ण आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास प्रक्रीयेवर लोकांनी विश्वास दाखविल्याचा उल्लेख करुन, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या योजनांच्या कामाला मिळालेले हे पाठबळ असल्याचे उद्गार महसूलमंत्री विखे यांनी काढले.
विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाची विकास प्रक्रीया वेगाने पुढे जात आहे. जलजीवन मिशनपासून ते देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची योजना प्रभावीपणे सुरु आहे. योजनांच्या रुपाने सरकारची धोरणं लोकांपर्यंत जात आहेत. भविष्यातही या योजनांचा लाभ ग्रामपंचायतींचे सदस्य या नात्याने तुम्हाला लोकांपर्यंत पाहोचवायच्या आहेत, असे आवाहन त्यांनी केले.
शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन सातत्याने सुरु राहणार आहे. गावाच्या विकास प्रक्रीयेला निधीची कमतरता भासणार नाही, तुम्ही फक्त काम करण्याची इच्छाशक्ती ठेवा, असे आवाहन मंत्री विखे पा. यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या नवीन पदाधिकार्यांनी देखील गावपातळीवर आता योजनांच्या रुपाने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम करावे. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनेचे माध्यम तुमच्या हातात असल्याने केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा प्रसार गावागावात करा, असे आवाहन मंत्री विखे पा. यांनी केले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री अण्णासाहेब म्हस्के पा., नितीन दिनकर, कांचन मांढरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमास तालुक्यांतील कार्यकर्ते, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.