राहुरी प्रतिनिधी: राज्यात दूध दरवाढीचा प्रश्नावर दूध उत्पादक शेतकरी सत्ताधार्यांशी संघर्ष करत आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करत आहे. पशुसंवर्धन तथा दुग्धविकास मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालण्याचा विरोधक इशारा देत आहेत.
खळबळजनक प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे
यातच राहुरीतून दूध भेसळीची मोठी माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने राहुरीत दोन ठिकाणी दूध भेसळीचे घातक रसायन, व्हे-पावडरचे नमुने जप्त करून भेसळीचे दूध नष्ट केले आहे.
राहुरी येथील शिलेगाव आणि माहेगाव येथे दूध भेसळीची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय वारघुडे आणि नगरचे सहआयुक्त भूषण मोरे यांनी संयुक्त पथक तयार करून या गावात छापेमारी केली. शिलेगाव येथे एका शेती क्षेत्रात छापा घातला असता तिथे दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आला. पथकाला तिथे दूध भेसळीचे घातक रसायन तसेच व्हे-पावडर आढळली. त्यातील काही नमुने तपासणीसाठी घेऊन भेसळीचे दूध नष्ट करण्यात आले आहे.
यावेळी पथकाला कारवाईसाठी येथे मोठा विरोध झाला. अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. प्रदीप पवार या विरोधात जखमी झाले. त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या कारवाईत विजय कातोरे हा निसटला, तर साहिल कातोरे याला पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.
माहेगाव येथील बाळासाहेब हापसे यांच्याही शेती क्षेत्रावर छापा घातला. तेथेही दूध भेसळीचे रसायन व व्हे पावडर मोठ्या प्रमाणात आढळली. भेसळखोर बाळासाहेब हापसे याने तिथून धूम ठोकली. राहुरी पोलीस ठाण्यात पथकाने जप्त केलेले भेसळीचे दूध, रसायन, व्हे पावडर आणली. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवाईप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.
यात विजय कातोरे, साहिल कातोरे (रा. शिलेगाव ता. राहुरी), बाळासाहेब हापसे (रा. माहेगाव, ता. राहुरी) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर जप्त केलेले नमुने व व्हे पावडर तपासणीसाठी सरकारी लॅबमध्ये पाठविली जाणार आहेत. लॅबच्या अहवालानुसार अधिक गुन्हे दाखल होतील, असेही अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.