अकोले: अकोले तालुक्यातील समशेरपूर वर्दळ असलेल्या फाट्यावरील चक्क एटीएमच मशीन पळविले. एटीएम मशीन चोरट्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडली आहे.
एटीएममध्ये चार लाखाची रोकड असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अकोले तालुक्यातील समशेरपूर फाटा येथे गजबजलेल्या अदिवासी सहकारी सोसायटी कॉम्पलेक्समध्ये इंडिया वन कंपनीचे एटीएम मशीन आहे. रात्री उशिरापर्यंत फाटा गजबजलेला असतो. या भागात मोठे व्यापारी संकुल असल्याने नागरिकांसह वाहनांचीही वर्दळ असते. बोलोरे जीपच्या मदतीने चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळविल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विजय करे फौजफाट्यासह समशेरपुरमध्ये पोहचले.ज्या ठिकाणी हे एटीएम मशीन लावले आहे, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र त्याची हार्ड डिस्क ही मशीनमध्येच लावलेली आहे. चोरट्यांनी एटीएम मशीन नेले त्यासोबत हार्ड डिस्कही गेली. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले किंवा कसे याचा खुलासा होण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.