शिर्डी वृत्तसेवा: राज्यात पुन्हा कोरोनाचा नवा व्हेरियंट जे.एन.1 सक्रिय झाला आहे. त्या दृष्टीने खबरदारी म्हणून साईभक्तांना ‘नो मास्क नो साईदर्शन’ अशी सक्ती केली जावी अशा सूचना महसूलमंत्री तथा अहमदनगर चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानला केली आहे.
शिर्डीत मंगळवारी साईदर्शन घेतल्यानंतर मंत्री विखे पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. साई संस्थानच्या वतीने प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी विखे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विखे पाटील म्हणाले की, राज्यात पुन्हा कोरोनाचा नवा व्हेरियंट सक्रिय होऊ लागला आहे. या दरम्यान नाताळ (ख्रिसमस) आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविक गर्दी करत आहेत. या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे.
साईबाबा संस्थानने शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्कची सक्ती करावी. मास्क नसेल तर दर्शनास परवानगी देऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तशा सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने साई संस्थानने ‘नो मास्क नो दर्शन’ अशी सक्ती करावी. त्याचबरोबर भाविकांना साई संस्थानाने मास्क देखील पुरवावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या.