अहमदनगर प्रतिनिधी: नेवासा तालुक्यातील सोनई येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन दोन शाळकरी मुली अंधश्रद्धेच्या बळी ठरल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. मुलींच्या अंगात सैतान आहे, म्हणून तुमच्यावर संकटे येतात. ते दूर करतो. त्यासाठी मुलींना दररोज चर्चमध्ये प्रार्थनेसाठी पाठवा, असे सांगून मुलींना चर्चमध्ये बोलावून घेतले. दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार केला.
ही घटना डिसेंबर २०२३ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान सोनई (ता. नेवासा) येथे घडली. याप्रकरणी तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.पास्टर उत्तम बलवंत वैरागर, संजय केरू वैरागर (दोघे रा. सोनई, ता. नेवासा), सुनील गुलाब गंगावणे (रा. अहमदनगर) असे याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला माहेरी आईकडे राहतात. त्यांची आई आजारी असते. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना चर्चमध्ये जाण्याचा सल्ला दिला. सदर महिला ही तिची आई, मुलगी व भाची अशा चौघी चर्चमध्ये गेल्या. तिथे त्यांना पास्टर उत्तम वैरागर भेटला. त्याने फिर्यादी महिलेच्या आईची विचारपूस केली व तुम्ही दररोज चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत जा. माझ्यापेक्षा मोठा पास्टर आल्यानंतर उपचार करू, असे तो त्यांना म्हणाला. तेव्हापासून फिर्यादी यांची आई प्रार्थनेसाठी चर्चेमध्ये जात होती.
त्यानंतर गतवर्षी वरील तिघे आरोपी महिलेच्या घरी आले. त्यावेळी त्यांनी आईच्या तब्येतीची विचारपूस करत प्रार्थना केली. तुमच्या मुलींमध्ये सैतान आहे. त्यांनाही प्रार्थनेसाठी घेऊन या, असे ते म्हणाले. त्यांनी घरातील सर्वांना चॉकलेट दिले व मुलीच्या पाठीवरून हात फिरविला. त्यानंतर ते घरातून निघून गेले. त्याचवेळी मुलींना संशय आला होता. पण ते मोठे असल्याने त्या काहीही बोलल्या नाहीत. त्यानंतरही महिलेची आई दोन्ही मुलींना घेऊन चर्चमध्ये जायच्या.एके दिवशी उत्तम वैरागर त्यांना म्हणाला की, तुमच्यावर जे संकट आहे, ते या मुलींच्या अंगात असलेल्या सैतानामुळे आहे. म्हणून यापुढे तुम्ही प्रार्थनेला येण्याची गरज नाही. या दोघींनाच पाठवत जा. त्यानुसार दोघी मुलींना चर्चमध्ये पाठविणे सुरू झाले. त्या शाळेतून आल्यानंतर चर्चमध्ये जायच्या.
गुरुवारी (दि. १५) नेहमीप्रमाणे दोघी अल्पवयीन मुली शाळा सुटल्यानंतर प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेल्या होत्या.एक वाजेच्या सुमारास त्या परत आल्या. त्यावेळी दोघे जण मोटारसायकलवरून आले. त्यांनी चर्चमध्ये मुलींशी केलेल्या गैरवर्तनाबाबतचा व्हिडीओ महिलेला दाखविला. त्यावरून हा प्रकार समोर आला. त्यांनी मुलींकडे विचारणा केली असता, वरील आरोपींनी गोड बोलून अत्याचार केल्याचे त्यांनी सांगितले.