विवेक कोल्हे यांचा शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर पालकमंत्र्या विरोधात थयथयाट
शिर्डी प्रतिनिधी: राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास कामे मंजूर करताना दुजाभाव करत असून, राजकीय द्वेषभावनेतून त्यांनी ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी जाणीवपूर्वक अडवला आहे. ते कोपरगाव व राहाता तालुक्यातील जनतेवर जाणीवपूर्वक अन्याय करीत असून, हा अन्याय थांबविण्यासाठी मी विखेंच्या विरोधात जनतेचे नेतृत्व करायला कधीही तयार आहे, असे सांगत विवेक कोल्हे यांनी विखे पाटलांवर घणाघाती टीका केली.
विवेक कोल्हे यांचा आजचा हा मोर्चा जनसामान्यांसाठी कमी तर विखे विरोधकांसाठीच दिसुन आला. सर्व विखे विरोधकांना एकत्र करत विवेक कोल्हे यांनी शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला व विखे पाटलांच्या विरोधात मीच नेतृत्व करतो अशी दर्पोक्ती केली. खरं तर यातून विवेक कोल्हे यांचा गर्विष्ठपणा व अहंकारी स्वभाव उपस्थितांना निदर्शनास आला.
अगदी काही दिवसांपूर्वीच राहाता येथे येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी ते काही विखे विरोधक घेऊन आले होते. खरं तर छत्रपतींचा पुतळा हा कोपरगाव मध्ये पण होता, परंतु कोपरगाव सोडून राहात्यात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार का असा प्रश्न सुज्ञ व्यक्तीस नक्कीच पडला असेल. फक्त विखे विरोधासाठी विवेक कोल्हे हे सामाजिक सलोखा बिघडवत आहेत का? विवेक कोल्हे आजही कुठलेही कारण नसताना आज शिर्डीत आपला शामियाना घेऊन डेरेदाखल झाले यात कोल्हेंचा हेतु नक्कीच संशयास्पद वाटतो.
तसे बघता विवेक कोल्हे यांनी केलेले जे काही आरोप आहेत ते तेथील लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे होते तर त्यास सत्यता आली असती, परंतु विवेक कोल्हे यांनी प्रसिद्धीसाठी केलेली नौटंकी असल्याचे जनता समजत आहे. आशुतोष काळे हे कोपरगाव चे आमदार आहेत आपल्या मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी ते सक्षम आहे. आशुतोष काळेंच्या माध्यमातून कोपरगावात तशी अनेक विकासकामे झालेली आहे. परंतु विवेक कोल्हे यांना विखे परिवारा बद्दल असलेला द्वेष त्यांना भरकटवत आहे, किंवा त्यांचे मार्गदर्शक त्यांना हे सर्व करण्यास भाग पाडत असावेत असे चित्र दिसत आहे.
विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (१ मार्च) शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर विखे विरोधकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिर्डीतील शासकीय विश्रामगृहापासून निघालेल्या या मोर्चात कोपरगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतींचे किती सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संचालक, उपस्थित होते हे पण बघण्यासारखे होते. याउलट मात्र सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व गणेश साखर कारखान्याचे संचालक, कोपरगाव चे काही भाजप पदाधिकारी काही प्रमाणात उपस्थित होते. हातात काळे झेंडे घेऊन, भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी विवेकभैय्या कोल्हे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, स्नेहलताताई कोल्हे आगे बढो, अशा स्वयं घोषणाची बरसात सुरू केली.
या मोर्चाच्या निमित्ताने विवेकभैय्या कोल्हे यांनी राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकेची तोफ डागली. त्यांनी खा. सुजय विखे, आ. आशुतोष काळे यांच्यावरही जोरदार टीका केली. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना विवेक कोल्हे म्हणाले, पालकमंत्री विखे पाटील हे स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करून प्रतिस्पर्ध्यांना संपवण्यासाठी मुस्कटदाबी व दडपशाहीचे राजकारण करत आहेत. असा आरोप विवेक कोल्हे यांनी केला आहे.
घराणेशाही चे ही गार्हाणे यावेळी विवेक कोल्हे यांनी केले, ते काय उपस्थितांना पचनी पडले असेल असे वाटत नाही. स्वतः विवेक कोल्हे हेच घराणेशाही चे पुरस्कर्ते आहेत त्यांनी हा आरोप करणं हास्यास्पद आहे.
खरं तर राजकारणात विकासकामे केली तरच जनता नेत्याला डोक्यावर घेते व नेता सांगेल तसं ऐकते देखील… परंतु जर आपण विकासकामेच केली नाही तर जनता तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहत नाही. हाच प्रकार कोल्हेंबाबत घडला आहे व त्याचे खापर ते विखे पाटलांवर आजही फोडत आहेत. आजचे आंदोलन ही यातीलच एक भाग असावा, व या आंदोलनाचे प्रायोजक मात्र ‘संगमनेरकर’ आहेत अशी सुद्धा दबक्या आवाजात चर्चा ऐकू येत होती.
यावेळी किसनराव गव्हाळे, धनंजय जाधव, चंद्रकांत धनवटे, विक्रम पाचोरे, जितेंद्र रणशूर, शिवाजीराव लहारे, साहेबराव रोहोम, कैलास रहाणे, डॉ. मोरे, सरपंच संदीप देवकर, अनुराग येवले, कानिफ गुंजाळ आदीं विखे विरोधकांनी पालकमंत्री विखे पाटील व आ. आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. सूत्रसंचालन दीपक चौधरी यांनी केले.