आधिकारी आणि पदाधिका-यां समवेत पाहाणी
संगमनेर दि.२ प्रतिनिधी : नगरपालिका हद्दीतील संजय गांधी नगर, कतार वस्ती, वडार वस्ती या झोपडपट्टीचे पुर्नवसन करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेवरुन जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ आणि अन्य आधिका-यांनी आज या परिसराची पाहाणी करुन, या झोपडपट्टी विकासाचा फेर विस्तारीत आराखडा सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
शहरातील या नगरामध्ये गेली अनेक वर्षे नागरीक राहत आहेत. या झोपडपट्टीच्या विकासाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित राहीला. भाजपाचे पदाधिकारी शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जावेद जहागिरदार, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष अमोल खताळ यांनी याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन, या झोपडपट्टीच्या विकासाबाबत तातडीने निर्णय करण्याची मागणी केली होती.
या संदर्भात मंत्रालयात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ९ जानेवारी २०२४ रोजी नगरविकास विभाग, म्हाडा आणि अहमदनगर जिल्हाधिकारी तसेच रहीवासी यांच्या समवेत बैठक घेवून त्यांच्या मागण्या व भूमिका समजावून घेण्यात आली होती. तसेच या परिसराची पाहाणी करुन आराखडा तयार करण्याच्या सुचनाही दिल्या होत्या.जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ यांनी आज या भागाची पाहाणी करुन, विश्रामगृहामध्ये रहीवाश्यांशी चर्चा केली. शशिकांत पवार, रमेश पवार, तारासिंग कतारी, विमल कतारी, नामदेव फुलमाळी, वाघोबा शेलार आदि रहीवाश्यांनी या चर्चेत सहभाग घेवून विविध सुचना केल्या.
लाभार्थ्यांच्या गरजा विचारात घेवून तसेच ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांच्या बाबतही विचार करण्याच्या दृष्टीने आणि अल्प उत्पन्न गटातील या रहीवाश्यांवर आर्थिक सहयोगाचा भाग कमी कसा येईल या दृष्टीने या प्रकल्पाचा फेरविकास आराखडा पुन्हा तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिका-यांनी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना दिल्या आहेत.