सविस्तर विश्लेषण: सहदेव जाधव
शिर्डी लोकसभा निवडणूक २०२४: तिरंगी लढत कुणाच्या पथ्यावर सर्व पक्षांमधील अंतर्गत बंडाळी उमेदवारांची ठरतीय डोकेदुखी शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा आरक्षित झाल्यापासून विखे थोरात यांच्या वर उमेदवारांच्या विजयाची मदार राहिली आहे. आज २०२४ च्या निवडणुकीत देखील हीच परिस्थिती आहे. महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे व महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात थेट लढत होत आहे. ही निवडणूक दुरंगी होत असतानाच काॅंग्रेस मधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी निवडणूकीचे रणशिंग फुंकले. आणि ही निवडणूक तिरंगी बनली.
महायुती चे उमेदवार सदाशिवराव लोखंडे
सदाशिवराव लोखंडे हे तिसऱ्यांदा शिर्डी मतदारसंघातून आपलं नशिब आजमावत आहेत. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत ते निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सदाशिवराव लोखंडे मतदार संघात फिरकले नाही असा त्यांच्यावर आरोप स्वपक्षीय व विरोधकांनी देखील केला. परंतु तरीही २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा लोखंडे यांना उमेदवारी दिली व नव्यानेच भाजप मध्ये आलेले विखे पाटलांवर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली. विखे पाटील शब्दाला जागले आणि मला समजून मतदान करा अशी मतदारांना साद घातली. येथे देखील विखे पाटील यांच्या वर विश्वास ठेवून मतदारांनी लोखंडे यांना निवडून दिले.
आज महायुती मधील अनेक नेते पदाधिकारी लोखंडे वर नाराज आहेत. तरीही वरीष्ठांच्या आग्रहास्तव प्रचारात सहभागी होत आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आर पी आय (आठवले गट) यांच्यात मोठी खदखद आहे. काही पक्षांमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे याचा फटका लोखंडे यांना बसू शकतो. अकोले तालुक्यातील पिचड व लहामटे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. एका मॅनात दोन तलवारी कशा राहणार म्हणून येथे कुणाची मनधरणी करायची यात लोखंडे यांची दमछाक झाली आहे. तर भाजप मध्ये देखील काही तालुक्यात अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आहे. तो मोठा फटका लोखंडे यांना बसू शकतो.
महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे
महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सततच्या पक्ष बदलांमुळे जनतेत विश्वासार्हता काही प्रमाणात कमी आहे. परंतु लोखंडे यांच्या पटीने वाकचौरे यांच्यावर मतदार होकारार्थी होते. महाविकास आघाडीचे काॅंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या वर वाकचौरे यांच्या विजयाची खरी मदार आहे. परंतु बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंके यांच्या साठी जेवढ्या सभा घेतल्या त्यामधील अर्ध्या सभा जरी वाकचौरेंसाठी घेतल्या असत्या तर बराचसा फरक वाकचौरेंना निवडून आणण्यासाठी झाला असता. सध्या तरी वाकचौरे यांची गोची झालेली दिसते आहे. वाकचौरे यांचा विजय सोपा वाटत असतानाच आता तो तेवढाच कठीण बनला आहे. हाडाचे शिवसैनिक यांच्यावर महत्वाची जबाबदारी टाळण्यात आल्याने ते देखील प्रचारात अनभिज्ञ आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी हे काही महिन्यांपूर्वी सदाशिवराव लोखंडे यांच्या सोबत लाभार्थी बनून फिरत होते. नंतर कधी कधी ते विखे पाटलांकडे जाऊन आम्ही तुमचेच असल्याचे भासवत होते. विखे पाटलांच्या अनेक कार्यक्रमात ते स्वार्थ साधण्यासाठी भटकत होते. परंतु आज निवडणुकीत जेव्हा वाकचौरे यांचे पारडे जड वाटायला लागले तसे यांनी आपला रंग बदलला व वाकचौरे यांच्या प्रचारात सामील झाले. परंतु या काही बोलघेवड्या पदाधिकार्यांनी हाडामासाचे व निष्ठावान पदाधिकाऱ्यांची गोची केली. वाकचौरे यांचा उद्याचा मताचा टक्का घसरला तर याला कारण हे फक्त निष्ठावानांची झालेली गळचेपी असणार आहे.
काॅंग्रेसचे मात्र वाकचौरे यांच्या साठी कितपत सहकार्य आहे हे आज होणाऱ्या मतदानावरुन कळेल. परंतु पदवीधरची पुनरावृत्ती झाली तर वाकचौरे हे थेट तिसऱ्या क्रमांकावर पिछाडीवर राहतील हे तेवढंच सत्य समजा.
वंचित बहुजन आघाडी उत्कर्षा रुपवते
उत्कर्षा रुपवते यांनी काॅंग्रेसमधून उमेदवारी करण्याची मागणी केली. परंतु काॅंग्रेस ने डावलल्याने त्या नाराज होऊन काॅंग्रेस पक्षातून बाहेर पडल्या आणि थेट बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. एक उच्च शिक्षीत तरुणी, उत्तम संघटक म्हणून असलेले गुण या सर्वांचा विचार करून आंबेडकरांनी त्यांना उमेदवारी दिली. प्रेशर कुकर हे चिन्ह घेऊन उत्कर्षा रुपवते या शिर्डी मतदारसंघाचा ‘उत्कर्ष’ करण्याचा संकल्प घेऊन निवडणूक रिंगणात उतरल्या.
अवघ्या महिना भरात पायाला भिंगरी बांधत, कुठलीही यंत्रणा नसताना कार्यकर्त्यांना ऍक्टिव करत प्रचारास सुरुवात केली. अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले जनसमुदाय बघून महायुती व महाविकास आघाडीसह राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. व येथील राजकीय समीकरणे बदलली.
काॅंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपणास तिकिट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाही असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. परंतु या पलीकडे उत्कर्षा रुपवते यांनी बाळासाहेब थोरात व विखे पाटील यांच्या बद्दल टिकेचा चिकार शब्द ही काढला नाही. खालच्या पातळीवर जाऊन दोन्ही ही उमेदवारांवर टिका केली नाही. आपल्या सुसंस्कृत कुटुंबांचे दर्शन यावेळी उत्कर्षा रुपवतेंकडून बघायला मिळाले.
राजूर येथे झालेला हल्ला व साकूर येथे फाडलेले बॅनर यापासून हतबल न होता शांत डोक्याने या सर्व घटनाना सामोरे गेल्या प्रचारात सातत्य राखत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. उद्याचा निकाल काहीही लागेल पण उत्कर्षा रुपवते यांनी मातब्बरांना घाम फोडला.
तर्क वितर्क व अफवांना पेव
उत्कर्षा रुपवते या वंचित बहुजन आघाडी कडून उभ्या राहिल्या आणि बरेच जणांनी रुपवते यांना थोरातांची छुपी मदत असल्याचे बोलले गेले. तर कधी लोखंडे यांच्या विजयासाठी ही शिंदे यांची खेळी असल्याचे बोलले गेले. उद्या होणाऱ्या मतदानावर हे सर्व तर्क वितर्क स्पष्ट होतील याचे सविस्तर विश्लेषण आपण करणारच आहोत.
क्रमशः लोकसभा निवडणूकीचा झांगडगुत्ता भाग:३