पारनेर प्रतिनिधी: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर आमदार रोहीत पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा पारनेर तालुक्यातील नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. यावर पारनेर येथील सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी रोहीत पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
राजकारण – समाजकारण ही समाजपरिवर्तानी दोन चाके आहेत. जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांनी देशासाठी मोठे योगदान दिले असुन गाव, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर मर्यादीत न राहता दिल्लीपर्यंत आंदोलन करत आदर्श गावाची संकल्पना प्रत्यक्षपणे राबवत शासकीय कार्यालयांमध्ये नागरीकांची होणारी विवंचना ,नागरिकांना कार्यालयांमध्ये मारावे लागणारे हेलपाटे थांबवण्यासाठी विविध कायदे लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करत यशस्वी केले. त्यामागचा मोठा संघर्ष आपल्याला विसरून चालणार नाही.
आण्णा हजारें यांनी कुठल्याही पदाची लालसा न ठेवता सत्ता संपत्ती सोबत भौतिक सुखांचा त्याग करत समाजाचा आवाज म्हणून त्यांनी मोठे काम केले आहे, याला देशवासी कदापी विसरणार नाही. आण्णांच्या कायद्याचा आधार घेवुन समाजपरिवर्तनाच कार्य करणाऱ्यांना मोठा आधार मिळत असुन अनेक रोपटी समाजकार्यासाठी उभी राहताना दिसत आहेत. परंतु दुषित राजकणातुन आज समाजामध्ये द्वेष पसरण्याची स्पर्धा चालु असुन राजकारणातुन समाजपरिवर्तनाच स्वप्न पाहणाऱ्यांनाही आपले हात काळे करताना पहायला मिळत असुन निवडणूका सुद्धा नकोशा झाल्या आहेत.
जेष्ठ नेते शरद पवारांनी आण्णा हजारेबद्दल केलेल्या वक्तव्यावर जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारेंनी दिलेली प्रतिक्रिया यावर रोहीत पवारांनी आण्णा हजारेंना ‘स्वयंघोषीत गांधी’ संबोधत जेष्ठांच्या विचारांवर एकतर्फी खालच्या पातळीवर जावुन टिका करण म्हणजे स्वतःला वजाबाकीच्या दिशेने घेवुन जाण्यासारखे आहे. जितेंद्र आव्हाडांनी नैतिकता सोडून आण्णा हजारेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न मर्यादा ओलंडणारा असून आण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे अनेकांना खुर्ची सोडावी लागली , अनेकांना जेलमध्ये जावे लागले त्याचबरोबर काहींना सत्तेतून पायउतार व्हावे लागले याचा राग मनात धरून काही अपप्रवृत्ती आण्णांना सातत्याने टार्गेट करत आहेत.
समाजाने नाकारलेल्यांनी आपली क्षमता वाढवावी समाजात विश्वास निर्माण करून ध्येय साधावे आण्णांवर टिका करून समाजाचा विश्वास मिळवता येणार नाही.. आण्णा हजारेंनी सत्ता पैसा यापासून स्वतः ला दुर ठेवत फकिराच जीवन अवलंबल अशा व्यक्तीमत्वावर बोलण म्हणजे सुर्यावर थुंकल्यासारखे होईल असे आण्णा हजारेंवर रोहीत पवारांसह इतरांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.