संपादकीय अग्रलेख:सहदेव जाधव
सध्या काही महिन्यांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असा मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊन ही काहींनी सरकार व ठराविक नेत्यांना वेठीस धरले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कुणाचाही विरोध नाही. परंतु तरीही काहीं कडून मुद्दामहून ओबीसींना व ओबीसी नेत्यांना टार्गेट करुन धमकी दिली जाते.
यात विशेषतः ओबीसींचे तसेच सध्याच्या सरकारमधील महत्वाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना खुलेआम शिवराळ भाषा वापरली जाते. धमकी दिली जाते. त्याचबरोबर सरकार ला देखील धमकावण्याचा प्रयत्न झाला आहे. मराठा समाज हा मुळात:च सुसंस्कृत समाज आहे. या समाजाने नेहमी वेगवेगळ्या समाजघटकांना दिशा देण्याचे काम केले आहे. यास इतिहास साक्षी आहे, हे नाकारता येणार नाही. मराठा समाजाने अनेकदा आंदोलने केली या आंदोलनांमधून कधीही हिंस्त्र भावना किंवा शिवराळ भाषा ऐकण्यात आली नाही. मराठा समाजाला आरक्षण नक्कीच दिले पाहिजे. परंतु काही जणांनी मराठा आरक्षणाची मेख ओळखून समाजाचा गैरफायदा घेत सरकारलाच वेठीस धरलं आहे… ओबीसी नेत्यांना शिव्या घालणं, आमदार, मंत्री यांना शिव्या देणं हे कुठलं आंदोलन, हे कुठले संस्कार..
काहींना मुख्यमंत्री होण्याची दिवा स्वप्न
मराठा आरक्षण निशाण्यावर ठेवून काहींनी जाती जातीत वाद लावण्याची भिष्म प्रतिज्ञा केली आहे. यासाठी आरक्षण मुद्दा घेऊन तब्बल वर्षभरात पाचव्यांदा उपोषणाची धमकी दिली आहे. यामागचा हेतू आता स्पष्ट होताना दिसत आहे. मराठा आरक्षण हा मुद्दा नसून देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण करणं व महायुतीचा पराभव व्हावा व काका मामाच्या माध्यमातून मुख्यमंत्री व्हावं असं दिवा स्वप्न काहींनी बाळगलं आहे. येणाऱ्या काळात या लोकांची अती महत्त्वाकांक्षी वृत्ती उद्या मराठा आणि ओबीसी समाजात मोठी दरी तर निर्माण करणार नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.
जेष्ठ नेते शरद पवार यांची भुमिकाच संशयास्पद
देशाचे नेते शरद पवार यांची भुमिका ही संशयास्पद राहिली आहे. अनेक राजकीय विश्लेषकांकडून मराठा आंदोलन भडकविण्यात काहींना स्वारस्य आढळून येते आहे. यामध्ये महायुती आणि विशेषतः भाजप सत्ते बाहेर कशी राहील याची योजनाबद्ध प्रणाली राबवली जात आहे. यामागे जनतेच्या व विशेष करुन मराठा समाजाला आरक्षण मुद्यावर डोळ्यात धूळफेक करुन आपलं कार्य फळास नेण्याचा काहींचा डाव आहे. काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे. हाच दृष्टिकोन ठेवून काही शकुनी विद्येची चाल खेळू पाहत आहे. आता या शकुनी विद्येने फक्त महाभारतच घडणार आहे. त्यामुळे सकल मराठा व ओबीसी समाजाने एकत्र येत सर्वांच्या हिताचा निर्णय घ्यावा. जाती जातीत वादंग वाढविण्यापेक्षा समान नागरी कायदा किंवा आर्थिक स्थिती वर आरक्षणासाठी लढा द्यावा. अशी भावना समाजात निर्माण करणं गरजेचं आहे. यासाठी ज्या व्यक्तींच्या पाठीमागे मोठा जनसमुदाय आहे अशा व्यक्तिंनी जातीय आरक्षणावर नको तर आर्थिक स्थिती वर आरक्षण कसे योग्य राहील यावर एनर्जी खर्च करावा.
मराठा व ओबीसी यांच्यात फुट पडावी हाच अट्टाहास काहींनी धरलाय. आमरण उपोषण करुन सरकारला वेठीस धरणे. संविधानिक पदावरील व्यक्तींना तसेच लोकप्रतिनिधींना शिवराळ भाषा वापरणं, हा त्रागा कशासाठी.? याचे उत्तर आता महाराष्ट्रातील जनतेला मिळाले असून…उपोषणामागची आपली महत्वकांक्षा फक्त भाजपला टार्गेट करणं व भाजप सत्तेतून पायउतार करणं एवढंच आहे. थोड्याच दिवसांत आपला हा चेहरा आपल्याच समाजापुढे उघडा पडणार आहे. म्हणून सावरा, आरक्षणावर सरकार निर्णय घेत आहे. आरक्षण मा. न्यायालयांत टिकले पाहिजे यासाठी वेळ लागतो. हे समजून घेतले पाहिजे. मुख्यमंत्री व्हायचे असेल तर संविधानिक मार्ग वापरा. कुणाला शिव्या देऊन, कुणाला कमी समजून, जाती जातीत भांडणं लाऊन तुम्हाला ते होता येणार नाही.