संगमनेर: संगमनेर येथील विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्जदार नंदकिशोर भास्कर गाडेकर रा. इंदिरानगर गल्ली क्र. १ यांनी पतसंस्थेला कर्ज फेडीसाठी दिलेला चेक न वटल्याने संगमनेर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मा .डी. एम. गिरी यांच्या कोर्टाने ९ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जदार नंदकिशोर गाडेकर याने संगमनेर येथील विश्वकर्मा पतसंस्थेतून दिनांक १६/१०/२०१५ रोजी रक्कम रुपये २,००,००० रुपये फिक्स लोन घेतले होते. सदर कर्ज थकबाकी झाल्या नंतर कर्जदाराने कर्ज बाकी फेडीसाठी पतसंस्थेला १,००,००० रुपयांचा चेक दिला. मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो परत आला. संस्थेने वकिलांमार्फत नोटीस पाठवून कर्जदाराकडे चेक रकमेची मागणी केली, परंतु त्याने टाळाटाळ केली.
या विरोधात संस्थेने संगमनेर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. डी. एम. गिरी यांच्या कोर्टात दावा दाखल केला. कर्जदाराने सदर चेक कर्ज फेडीसाठी दिला होता. तो वटला नाही आरोपी विरुद्ध याबाबी पतसंस्थेने सिद्ध केल्या. दोन्ही बाजूंकडून दाखल कागदपत्रे व सुनावणीअंती आरोपी विरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. डी. एम. गिरी यांनी कर्जदाराला ९ महिने साधी कारावास व रुपये १,१०,००० रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच चेकची रक्कम विश्वकर्मा पतसंस्थेला देण्याचेही आदेशीत केले आहे.
सदर दाव्याचे कामकाज संस्थेतर्फे संस्थेचे वकील श्री. बी. के. वामन व संस्थेचे कर्मचारी श्री. अनिल पवार यांनी पाहिले. सदर झालेल्या कारवाईमुळे खोटे चेक देणे व कर्ज थकविणा-यांवर जरब बसेल अशी माहिती विश्वकर्मा पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री. अरुण उदमले यांनी दिली आहे.