आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा भोसले यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. आशियाई स्पर्धेला जाण्यासाठी जेवढं कष्ट केलं होतं, त्याचं फळ आज मिळलं असल्यानं साईबाबांचे धन्यवाद मानण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया ऋतुजा भोसले यांनी दिली.या पुढेही आमच्या कष्टाला असंच फळ मिळत राहावं, अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना त्यांनी केली. साईबाबांच्या दर्शनानंतर ऋतुजा भोसले प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
अहमदनगर (शिर्डी) : चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर गुरुवारी ऋतुजा भोसले यांनी आपल्या कुटुंबियांसोबत साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी ऋतुजा भोसले यांनी आपले सुवर्णपदक साईबाबांच्या समाधीवर ठेवत आगामी ग्रँड स्लँम स्पर्धेत कॉलीफाय होण्यासाठी बळ मिळो, अशी प्रार्थना केली
मुलीला व्हीआयपी प्रोटोकॉल :
ऋतुजा भोसलेंचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील कारेगाव येथे झाला. त्यांचे वडील संपत भोसले हे पोलीस अधिकारी असून, ते सध्या अहमदनगर ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी आहेत. एरव्ही मी शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या व्हीआयपींना वाट मोकळी करुन देतो तसेच त्यांच्या बंदोबस्ताचे नियोजन करतो. मात्र, आज आपल्या मुलीला व्हीआयपी प्रोटोकॉल देणे हा क्षण आनंदाचा होता, अशी प्रतिक्रिया ऋतुजाच्या वडिलांनी दिली.
ऋतुजानं देशासाठी आणलं मेडल :
ऋतुजा यांचे पती स्वप्नील गुगले हेही रणजी क्रिकेट खेळाडू आहेत. किक्रेटच्या मानाने लाँग टेनिस हा खेळ क्रिकेट इतका प्रचलित नाही. मी ऋतुजाचा प्रवास अगदी जवळुन पाहिलेला आहे. फारसे कुटुंबिय टेनिस खेळात मुलांना पाठवत नाही. मात्र, ऋतुजाने देशासाठी आणलेलं मेडल अभिमानास्पद असल्याचं स्वप्नील यांनी म्हटलंय.
साई मूर्ती आणि शाल देऊन केला सन्मान :
साईबाबा संस्थानच्या वतीनं ऋतुजा भोसले यांचा साई मूर्ती आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. ऋतुजा भोसले यांचे वडील संपत भोसले हे पोलीस खात्यात आहेत. काहीकाळ ते शिर्डी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. यामुळं शिर्डीतील ग्रामस्थांसह साईबाबा संस्थानचं कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी शिर्डी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक रविंद्र गोंदकर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर यांनी ऋतुजा भोसले यांचा सन्मान केला.