महारेलच्या वतीने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुरु मात्र त्यात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. पुन्हा प्रस्ताव तयार करणार.
पुणे : पुणे आणि नाशिक ही दोन महत्वाची शहरे रेल्वेने जोडली गेली नाही. ही शहरे जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या मार्गावर सेमीहायस्पीड ट्रेन धावणार आहे. महारेलच्या वतीने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुरु करण्यात आले आहे. पुण्यात नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती. त्या बैठकीत हा मार्गाचे काम लवकर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. भूसंपादनाच्या अडचणी दूर करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. ही सर्व प्रक्रिया सुरु असताना आणखी एक महत्वाचे अपडेट हाती आली आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मध्य रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. परंतु त्यात काही त्रुटी आढळून आल्या. यामुळे त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेतला गेला नाही. आता या त्रुटींवर मध्य रेल्वेकडून काम करण्यात येणार आहे. त्या त्रुटी दूर करुन नवीन प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरच सेमी हायस्पीड रेल्वेचा अंतिम आराखडा तयार होणार आहे. त्रुटी दूर करुन पाठवलेल्या अंतिम आराखडा रेल्वे बोर्ड आणि पंतप्रधान कार्यालयास मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
235 किलोमीटरचा हा मार्ग पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातून जातो. नगर जिल्ह्यात खोडद (ता. जुन्नर) येथे जीएमआरटी प्रकल्प आहे. महाकाय दुर्बिण असलेल्या या प्रकल्पाजवळून रेल्वे लाईन जात आहे. त्यासंदर्भात अद्यापपर्यंत मार्ग निघालेला नाही. त्यामुळे ही समस्या सोडवावी लागणार आहे. त्यानंतरच सेमीहायस्पीड ट्रेनचा मार्ग मोकळा होणार आहे.